उत्तमनगर: उत्तमनगर परिसरात भाजीविक्रेते व ग्राहक हे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे पोलीस ठाणे,व्यापारी संघटना,स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून शिवणे-उत्तमनगर-कोपरे-कोंढवे धावडे येथील सर्व दुकानदार व भाजी विक्रेते यांना जाहीर आवाहन करण्यात आले की, कोरोनाचा प्रादुर्भाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व्यापारी संघटना व सर्व पदाधिकारी यांनी भाजी विक्रीबाबत १३ ते १६ मेपर्यंत सर्व भाजी विक्री बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. कोणतेही भाजीविक्रेते हे भाजीविक्री करण्याकरता रस्त्यावर हातगाडी अगर स्टॉल लावणार नाहीत.
अत्यावश्यक सेवांमधील दूध डेअरी सकाळी ०७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच भाजी व फळ विक्रेते ह्यांची दुकान बंद राहूतील. १७ मेला सर्व भाजीविक्रेत्यांनी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे. भाजी विक्रेते व किराणा माल दूध डेअरी विक्रेते यांच्याजवळ प्रमाणपत्र नसल्यास त्यांना आपले दुकान सुरू करता येणार नाही. वरील वेळेचे बंधन पाळून सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकानदार व व्यापारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता स्थानिक प्रशासन व स्थानिक पदाधिकारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.