उदापूर (पुणे) : माळीन आणि इर्शाळवाडीसारखी गंभीर परिस्थिती इतर ठिकाणी होऊ नये यासाठी दरडीची भीती असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पश्चिम पट्ट्यातील तळमाची या ठिकाणी डोंगराच्या कडेला पडलेल्या भेगांचा पाहणी दौरा करण्यात आला.
माळीन व इर्शाळवाडीची पुनरावृत्ती न होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून ही खबरदारी घेतली जात आहे. तळमाची वाडी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो अनेक वर्षापासून या ठिकाणी लांबच लांब भेगा पडलेल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात भेगा पडतात त्यामुळे नागरिक मुठीत जीव घेऊन या ठिकाणी राहत असतात. पावसाळा चालू झाला की या ठिकाणी वास्तव करणे हे खूप धोकादायक आहे, असे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहे. दरवर्षी पावसाळ्यात आमच्या जीविताला धोका निर्माण होत असल्यामुळे तळमाच्या वाडीचे पुनर्वसन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी अनेक अधिकारी येऊन पाहणी करून गेले; पण या तळमाच्या वाडीची स्थलांतर अजूनही झाली नाही. माळीन व इरशाल वाडी या दोन्ही दुर्घटनेत माझा आदिवासी समाज बळी पडला डोंगरी भागात जास्तीत जास्त आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहत आहे दहा ते पंधरा वर्षांपासून पहाणी व वारंवार पंचनामे करून रिपोर्ट पाठवले जात आहे. परंतु अजूनही पुनर्वसन झाले नाही. आता तळमची वाडी ही मातीच्या ढिगाऱ्याखाली जाण्याची वाट संबंधित अधिकारी पाहत आहे का? असा सवालही स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला.
नागरिकांना घाबरून न जाता येथील घडामोडी स्थानिकांनी कळवत राहा आमचे अधिकारी वेळोवेळी येऊन चौकशी करतील गावातील परिस्थिती पाहतील, तसेच काही तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय करू व येथील आदिवासी बांधवांना राशनही वाटप चालू राहील, असे आश्वासन जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिले.