लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे न झुकता, ‘पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी मैलापाणी वहन व्यवस्थेबाबत मास्टर प्लॅन’ तयार करताना व संबंधित कामांची निविदा काढताना प्रशासनाने खूप सावध भूमिका घेतली आहे़ या निविदा प्रक्रियेत सर्व कायदेशीर बाबी तपासून व तांत्रिक समिती नियुक्त करून त्यांच्या सल्ल्यानुसारच नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे़
केवळ एका ठेकेदाराला समोर ठेऊन ११ गावांच्या मैलापाणी वहन व्यवस्थेबाबतचा मास्टर प्लॅन तयार करून ३९२ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाविरोधात काहींनी दंड थोपाटले होते़ तर काही जण न्यायालयातही गेले आहेत़ यामुळे महापालिका प्रशासनाने आता सत्ताधाºयांना बळी न पडता, या कामांच्या निविदांसाठीची तांत्रिक समितीची निुयक्ती केली आहे़ यामध्ये शहर अभियंता, विद्युत अभियंता, पाणीपुरवठा अभियंता यांच्यासह संबंधित विभाग प्रमुखांची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे़
या ११ गावांमधील त्या कामासाठी सध्या चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून, या सर्व निविदांची छाननी या समितीकडून करण्यात येणार आहे़ त्यानंतर महापालिका आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल सादर करून, सर्व तांत्रिक बाबींची सहानिशा केल्यावरच या कामांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे़
-----------------------------
११ गावांसाठी मैलापाणी वाहन व्यवस्थेबाबत चार जणांनी निविदा सादर केल्या आहेत़ या सर्व निविदांची तांत्रिक समितीकडून तपासणी केली जाणार असून, तो अहवाल महापालिका आयुक्तांकडे देण्यात येणार आहे़ त्यानंतरच याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे़
- डॉ. कुणाल खेमनार अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा
--------------------------