राजगुरुनगर: खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभा, फेऱ्या, सुरू झाल्या आहे. मात्र, यासाठी काही ठिकाणी परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या अंमजबजावणीमध्ये तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचीच चर्चा सध्या सुरू आहे.
तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जण नवनवीन कुल्प्त्या लढवतानाही दिसत नाही. पारावर तर सत्ता कोणाची येणार, यावर चर्चा होऊ लागली असून पैजाही लावल्या जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्स ॲप्, फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे. त्यामुळे प्रचार तंत्रात बदल केल्याचे प्रकर्षणाने जाणवते. हा प्रचार सुरू असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर आले. कोणाकडे मास्क आहे तर कोणाकडे सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाल्याचे दिसते.
दुसरीकडे प्रचार सुरू होताच आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रचाराची वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत असतानाही काही उमेदवार अथवा कार्यकर्ते रात्री-अपरात्री मतदांराचे दार ठोठावत असल्याने नागरिक पुरते त्रासले आहे. प्रचासभांमधून मतदारांना आमिष देण्याचे प्रकारही घडत आहे. मात्र, याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचे दिसते. यासंदर्भात कोणी तक्रार केली तर खडबडून जागे झालेले सरकारी अधिकारी व कर्मचारी संबंधित माहिती घेण्यासाठी आटापिटा करताहेत. जेवणावळीला ऊत आला असून सर्वच ढाबे हाऊसफुल्ल झाले आहेत. काही उमेदवारांनी तर थेट शेतात जेवणावळीस सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर फ्लेक्स लावताना, प्रचारफेरी काढताना परवानगी घेणे आवश्यक असतानाही त्याकडेही दुर्लक्ष करत आहे. निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च एक महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.परंतु, अनेकांनी या खर्चाचीच माहिती दिली नाही. एकूणच आचारसंहिता कक्षात तक्रारींचा पाऊस पडत असताना निवारण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खेड तालुक्याच्या तहसीलदारपदी वैशाली वाघमारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील घडामोडींची त्यांना फारशी माहिती दिसत नाही. त्याचाच फायदा काही अधिकारी व कर्मचारी घेत आहे. आचारसंहितेसंदर्भात बैठक घेणे गरजेचे असतानाही तशी कोणतीही बैठक पार पडली नाही. किंवा निवडणुकीसंदर्भात प्रशासनाने काय तयारी केली आहे. याची माहिती देणे गरजेचे असतानाही तसे काही झाले नाही. त्यामुळे कायार्लयात सर्व काही अलबेल सुरु असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
०९ राजगुरुनगर फेरी