वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या ११ ग्रामपंचायतींवर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात साळुंब्रे, डोणे, आढले व उदेवाडी या गावांचा समावेश आहे, तर पुढील महिन्यात आंबळे, बेबेडओहोळ, शिळिंब व लोहगड या गावांवर व मे महिन्यात भाजे, मुंढावरे, संगिसे या गावांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या गावांतील ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक न झाल्याने या ठिकाणी प्रशासक लागू करण्यात आले आहेत. प्रशासक लागू झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याने, या गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.
यात साळुंब्रे व डोने ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ४ जानेवारी रोजी संपला आहे. त्या ठिकाणी गट विस्तार अधिकारी एन.जे. ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आढले ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ३ जानेवारी रोजी संपला असून, त्या ठिकाणी एन.जे. ढवळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उधेवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ५ जानेवारी रोजी संपला असून, त्या ठिकाणी एस.के. खांडेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
तर आंबळे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी रोजी संपणार असून, तेथे बी.डी. वायकर हे प्रशासक असणार आहेत. शिळीब ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपणार असून, त्या ठिकाणी एन.जे. ढवळे हे प्रशासक असणार आहेत. लोहगड व बेबेडओहोळ या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपणार असून, तेथे एन.जे. ढवळे हे प्रशासक असणार आहे, तसेच भाजे, मुंढावरे व संगिसे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २ मे रोजी संपणार असून, तेथे एस.के. खांडेकर हे प्रशासक असणार आहेत.