पुणे : खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी गुरुवारी विधवा प्रथाबंदी करण्याबाबत ठराव मंजूर करण्याचे निश्चित केले आहे. अशा पद्धतीने ठराव करणारा खडकवासला मतदारसंघ हा राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला आहे.
राज्य सरकार व राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर, आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसूत्र न काढता, विधवा प्रथाबंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती. आता त्या या मतदारसंघातच विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा उपस्थित राहणार आहेत.