नितीन गायकवाड
एरंडवणे : ६२ वर्षीय अनंत अगरखेडकर (रा. कोथरूड) यांनी गेल्या वर्षी ३ ऑगस्ट रोजी दररोज सिंहगड किल्ल्यावर पायवाटेने चढणे आणि उतरणे अशी मोहीम सुरू केली होती. १३ मार्च २०२३ रोजी सलग २२३ दिवस मोहीम पूर्ण केली आहे. आजपर्यंत कोणत्याही वयाच्या व्यक्तीने सलग इतके दिवस पायी सिंहगड चढणे-उतरणे मोहीम केल्याची नोंद नाही. २२ व २३ ही दोन्ही वर्षे २२३ या आकड्यामध्ये येतात, त्यामुळे २२३ दिवस उपक्रम करण्याचे त्यांनी निश्चित केल्याचे ते सांगतात. या वयातील त्यांच्या धैर्याचे आणि ऊर्जेचे अनेकांकडून कौतुक होत आहे.
अगरखेडकर हे २००३ सालापासून सुरू असलेल्या मूनलाइट वॉक ग्रुपचे सदस्य आहेत. ३१६ सदस्य असलेला हा ग्रुप दर पौर्णिमेला रात्री राजाराम पूल ते आतकरवाडी सिंहगड पायथा असा १८ किमीचा पायी प्रवास करतात. ३० ते ७५ वर्षे वयाचे सदस्य असलेला हा ग्रुप येत्या डिसेंबरमध्ये सलग १०० महिन्यांचा मूनलाइट वॉक पूर्ण करणार आहे. वर्षातून एकदा हिवाळ्यात पुणे ते लोणावळा ६५ किमी आणि दुसऱ्या दिवशी लोणावळा ते पुणे ६५ किमीचा वॉक ग्रुपचे सदस्य करतात. या व्यतिरिक्त कात्रज ते सिंहगड (के टू एस) १५ डोंगरांचा ट्रेक वर्षातून किमान तीन वेळा करतात. तळजाई टेकडी येथेही आठवड्यातून तीनदा १० किमीचा वॉक पहाटे अगरखेडकर सदस्यांसोबत करतात. त्यांनी गेल्या वर्षी पीवायसी येथे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ किमी इनडोअर रनिंग केले आहे. तसेच पर्यावरण दिनी हाफ एव्हरेस्टिंग (सलग ९ वेळा सिंहगड चढणे) पूर्ण केले आहे.
''आज मला अनेकांनी अभिनंदन शुभेच्छा दिल्या. पण सर्वांना माझे एकच सांगणे आहे की, आजच्या स्पर्धात्मक काळात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शरीर व मन या दोन्हींचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यावर मेहनत घेणे गरजेचे आहे, ज्याला हे समजेल आणि त्यादृष्टीने काम सुरू करेल तोच या काळात टिकेल. त्यांचा मुलगा अक्षय हा फिटनेस कोच आहे. त्याच्याकडून आहार, स्ट्रेचिंग, व्यायाम करण्यापूर्वी व नंतर घ्यावयाची काळजी, या बाबतचे मार्गदर्शन मिळते. - अनंत अगरखेडकर''