पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध भागांमधील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २९ हजार ४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी विद्यापीठाच्या २० अभ्यासक्रमांस प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. परिणामी या अभ्यासक्रमाचे प्रवेश संबंधित विभागाकडून ऑफलाईन पध्दतीने केले जाणार आहेत.
विद्यापीठ परिसरातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. विद्यापीठातर्फे विभागातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातील ६८ अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परीक्षा येत्या २५ ते २८ जुलै या कालावधीत परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात प्राप्त होणा-या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिध्द करून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यापीठातील काही विभागांच्या प्रवेश क्षमतेत वाढ केली असून या विभागांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ का फिरवली ? याचाही विचार विद्यापीठाला करावा लागणार आहे.
-----------------------