पुणे : अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीतून २० हजार ७४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी येत्या २५ सप्टेंबरपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे आवश्यक आहे. त्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची दुसरी विशेष फेऱ्या राबविली जाण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका परिसरातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर, राबविलेल्या पहिल्या विशेष फेरीसाठी २३ हजार १४६ विद्यार्थी पात्र झाले. त्यातील २० हजार ७४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
विशेष फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार ऑनलाईन प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे या फेरीतून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेले गुण आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ विचारात घेऊन पसंतीक्रम नोंदवणे अपेक्षित आहे. विशेष फेरीसाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी याचा विचार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे २० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
------------------------
पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
पसंतीक्रम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
१ १४,५२५
२ २९११
३ १०१८
४ ५४४
५ ३५७
६ २१९
७ १५२
८ १११
९ ५६
१० ३०