मुंबई - वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमासाठी एक दिवस मुदत वाढविल्यानंतर तब्बल अडीच हजार प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची विविध शाखांकरिता संख्याही वाढली असून, गुरुवारी शेवटच्या दिवशी ५९ हजार २७६ विद्यार्थी निश्चित झाले आहेत. या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी शाखेसाठी विद्यार्थ्यांची प्रथम पसंती असून, त्याखालोखाल वैद्यकीय आणि फार्मसी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे.एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आदी वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २२ जूनपासून सुरू झाली आहे. ५९ हजार २७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. शनिवारपासून (ता. २९) ते ४ जुलैपर्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. १२वीच्या परीक्षेतील आणि नीट परीक्षेतील गुणांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, धुळे आदी ठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत.एमबीबीएस, बीडीएससाठी सीईटीच्या संकेतस्थळावर सीट मॅट्रिक्स ३० जूनपर्यंत जाहीर करण्यात येईल. एमबीबीएस, बीडीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस आणि बीयूएमएससाठी विद्यार्थ्यांनी कागदपत्र पडताळणी महाराष्ट्र सीईटी सेलने बंधनकारक केली आहे.अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया शनिवारी (ता. २९) सकाळी १० वाजता सुरू होईल. ती ३ जुलैपर्यंत सकाळी १० वाजता व दुपारी २ वाजल्यापासून पुढे फोर्ट येथील प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कार्यालयात होईल.
वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यभरातून ५९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 6:55 AM