पुणे : मेट्रोच्या कर्वे रस्त्यावरील गरवारे स्थानकाचे जिने आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जागेत असणार आहेत. त्यासाठी महामेट्रो कंपनीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो)कडून रितसर जागा विकत घेतली आहे.
वनाज ते गरवारे या मेट्रो मार्गाचे त्यावरील ५ स्थानके वगळता सर्व काम पूर्ण झाले आहे. स्थानकांचे कामही गतीने सुरू आहे. गरवारे महाविद्यालयासमोरील स्थानकाच्या पहिल्या मजल्याचे छत बांधून तयार आहे. या स्थानकात प्रवाशांना महाविद्यालयाच्या आवारातून प्रवेश करावा लागेल.
महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानाची तसेच त्यापुढची जागा सोसायटीने महामेट्रोला विकत दिली. उद्यानाच्या जागेत वर जाण्यासाठी व त्यापुढील जागेत वरून खाली येण्यासाठी जिने असतील. सरकते जिने व लिफ्टही असणार आहे अशी माहिती महामेट्रोच्यावतीने देण्यात आली.
चौकट
चौकट
“संस्थेकडून कायदेशीर प्रक्रियेने जागेची विक्री करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाला. सार्वजनिक हिताचे काम म्हणून संस्थेने हा निर्णय घेतला. वनस्पती उद्यानाचे यात काहीही नुकसान झालेले नाही. सर्व झाडांचे संस्थेच्याच आवारात पुनर्रोपण करण्यात आले.”
-सचिन आंबर्डेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, मएसो.