पुणे : महापालिकेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, हे प्रवेश यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परिक्षाच न झाल्याने ही अडचण उभी राहिली आहे. दरम्यान, महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या अधिष्ठाता नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
पालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. ट्रस्टच्या माध्यमातून हे महाविद्यालय चालविले जाणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या आवश्यक परवानग्या पालिकेला प्राप्त झालेल्या आहेत. कमला नेहरू रुग्णालयाजवळील सणस शाळेमध्ये महाविद्यालयाचे तात्पुरते बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
यावर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करून १०० विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पालिकेने त्याकरिता ''टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफ'' भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सेवकवर्गाकडून त्याची छाननी सुरू आहे.
पुढील वर्षी पालिकेच्या सार्वत्रिक निडवणुका असल्याने भाजपाने हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला आहे. वैद्यकीय प्रवेशासंबंधी माहिती घेण्याकरिता केंद्र शासनाचे एक पथक पुण्यात येणार आहे.