पुणे : ‘अरे आवाज कुणाचा’ च्या जल्लोषात पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा येत्या १४ ते २९ ऑगस्ट दरम्यान भरत नाट्य मंदिरात रंगणार आहे. दरवर्षी ५१ महाविद्यालयांच्या संघामध्ये स्पर्धा होते. यंदाच्या वर्षी २१ नवीन महाविद्यालयांपैकी १५ महाविद्यालयांच्या संघाचा प्रवेश निश्चित झाला असून, सहा महाविद्यालये अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत. ३ आणि ४ ऑगस्टला संघाच्या प्रवेश पत्रिका स्वीकारल्या जाणार असून. स्पर्धेत किती महाविद्यालये सहभागी होतील, याचे चित्र ७ ऑगस्टला स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा दरवर्षी ऑगस्टमध्ये रंगते. तत्पूर्वी त्यात सहभागी होण्यासाठीच्या पत्रिकेचे वाटप केले जाते. यंदा १४ आणि १५ जुलैला प्रवेश पत्रिकेचे वाटप करण्यात आले. स्पर्धेत दरवर्षी ५१ महाविद्यालयांच्या संघात स्पर्धा होते. त्यातील ४१ संघ स्पर्धेत पुढील वर्षीही सहभाग घेतात. तर परीक्षकांकडून सुधारणेला वाव असलेल्या १० संघांची निवड करण्यात येते. तेही पुढील वर्षीच्या स्पर्धेत भाग होण्यासाठी प्रयत्न करतात. सुधारणेला वाव असलेल्या १० संघासह नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांची नावे ड्रॉ पद्धतीने काढली जातात.
महाराष्ट्रीय कलोपासकचे विश्वस्त मंगेश शिंदे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही परीक्षकांकडून सुधारणेला वाव असलेल्या १० संघाची नावे जाहीर केली होती. त्याप्रमाणे यंदा २१ महाविद्यालये प्रतीक्षा यादीत होती. त्यातील काही महाविद्यालयांसह यंदा १५ महाविद्यालयांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तर ६ महाविद्यालये प्रतीक्षा यादीत आहेत.