वानवडी : प्लेग्रुप व नर्सरीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे कोणतेही अधिकृत आदेश आले नाही. वानवडीतील प्ले ग्रुप व नर्सरी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस तूर्तास तरी सुरुवात झाली नाही.
१ फेब्रुवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाकडून आदेश दिले आहेत. त्यामुळे ते वर्ग पूर्ण काळजी घेऊनच सुरू होणार आहेत. परंतु, प्ले ग्रुप व नर्सरीमधील मुले लहान असल्याने त्यांचे वर्ग सुरु करण्याची कोणतीही नियमावली वानवडीतील शाळेंना मिळाली नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया बंदच ठेवली आहे. तसेच प्रवेशशुल्क किती आकारण्यात येईल, तेही शासनाच्या शाळा सुरु करण्याबाबतच्या नियमावलींवर अवलंबून असल्याचे वानवडीतील शाळेंच्या विश्वस्तांनी सांगितले.
मागील १० महिने बंद असलेल्या प्लेग्रुप व नर्सरी शाळेचा परिसर, वर्ग व शाळेच्या इमारती स्वच्छ व रंगरंगोटी करण्याचे काम प्राथमिक स्थरावर सुरू झाले आहे. मुलांच्या प्रवेशासाठी शाळांना पालकांचे फोन येत आहेत. परंतु, शासनाकडून कोणतीही नियमावली न आल्याने प्रवेश घेण्यास सुरुवात झाली नाही.