लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असणारी आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ची पदभरती दि. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. लाखो तरुणांनी यासाठी अर्ज केले आहेत. पदभरती परीक्षा अगदी दोन दिवसांवर असताना या प्रक्रियेसाठीच्या संकेतस्थळावर काही अडचणी येत आहेत. परीक्षा काही दिवसांवर राहिलेली असताना प्रवेशपत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांच्याशी संपर्क साधला होता. पुढील दोन दिवसांत या सर्व अडचणी दूर होतील आणि विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळतील असे डॉ. पवार यांनी अश्वस्त केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
राज्यातील विद्यार्थी कोरोनाच्या भीषण संकटासोबत लढता लढता बेरोजगारीशी देखील झुंज देत आहेत अशा स्थितीत अखेर परीक्षा होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. एककीकडे राज्य सरकार तरुणांना दिलासा द्यायचा प्रयत्न करत असताना परीक्षा यंत्रणा आणि प्रशासन यांचे वारंवार दुर्लक्ष होत आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या ६,१४४ पदांसाठी दि. २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी पदभरती परीक्षा होत आहे. परीक्षेच्या अंतिम तयारीसाठी काही दिवस शिल्लक असताना हॉल तिकीट डाउनलोड करण्यास येत असलेल्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
----
नेमकी परीक्षा द्यायची कुठे?
विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा उल्लेखच नाही, तर काही विद्यार्थ्यांचे फोटो नाहीत. या सगळ्या अडचणींमुळे नेमकी परीक्षा द्यायची कुठे? विद्यार्थ्यांच्या तपासणीविना फोटो प्रवेश पत्रावर कसे होणार ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. यामुळे त्यांच्या सकारात्मक मानिसकतेवर देखील परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.