पुणे: राज्यात आरटीई अंतर्गत खाजगी शाळांत रिक्त असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या नियमित फेरी अंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत दि. ८ ऑगस्ट राेजी संपली. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी दि. १७ ऑगस्ट पासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू हाेणार आहे. पालकांना येत्या २३ ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांची पडताळणी करीत शाळेत प्रवेश घेता येणार आहे.
आरटीई अंतर्गत खाजगी शाळांतील १ लाख ५ हजार २३३ रीक्त जागांवर मुलांना प्रवेश मिळावा यासाठी यंदा राज्यभरातून २ लाख ४२ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले हाेते. जून महिन्यांत ऑनलाईन साेडत काढल्यानंतर दि. २० जुलै राेजी पहिल्या नियमित फेरीत ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला तसेच ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादीही प्रसिद्ध करण्यात आली हाेती. दि. २३ जुलै पासून प्रवेशाला सुरूवात झाली. दि. ८ ऑगस्ट पर्यंत ६१ हजार १९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला केव्हा सुरूवात हाेणार याकडे पालकांचे लक्ष लागून हाेते. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गाेसावी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करीत दि. १६ ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली आहे.
प्रवेशासाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत मुदत
आरटीई पाेर्टलवर प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. १७ ऑगस्ट राेजी विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध हाेणार आहे. त्यानंतर लागलीच प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ हाेणार आहे. पालकांना दि. २३ ऑगस्ट पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
प्रतिक्षा यादी एक मध्ये निवड केलेल्या २३ हजार ८५० विद्यार्थ्यांची यादी तयार केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठविण्यास सुरूवात केली आहे. - शरद गाेसावी , शिक्षण संचालक, प्राथमिक