बारामती : बारामतीएमआयडीसीतील एका कंपनीला भेसळयुक्त दूध विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. . अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे दुधभेसळ उजेडात आली. अहवालात दूधामध्ये डिर्टजंट भेसळ असल्याचे आढळने आहे. या कारवाईत जामखेड आणि विडणी येथील दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी जितेंद्र कर्णे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार खर्डा (ता. जामखेड, जि. नगर) येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राचे मालक वैभव दत्तात्रय जमकावळे व वाहनचालक संपत भगवान ननावरे (रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) या दोघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ जुलै रोजी बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी एस. बी. अंकुश यांना यासंबंधी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बी. ए. शिंदे, सहाय्यक आयुक्त ए. जी. भुजबळ, जिल्हा दूध विकास अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने कंपनी मालकासमवेत टँकरची तपासणी केली. या टँकरमधील दूध शिवकृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र, खर्डा येथून आणल्याचे चलन चालक ननावरे यांनी सादर केले.
टँकरमध्ये साडे आठ हजार लिटर गाईचे दूध होते. टँकरमधील दूधाची तपासणी श्रीमती एस. बी. अंकुश यांनी पंचासमक्ष केली. टँकरमधील तीन लीटर दूध विश्लेषणासाठी घेण्यात आले. जिल्हा दूध विकास विभागातर्फे कांबळे यांनी त्याची लॅबमध्ये तपासणी केली असता मानदाप्रमाणे दूध नसल्याचे आढळून आले. त्यानंतर उर्वरित ८ हजार ४९७ लिटर दूध भेसळयुक्त आढल्याने बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगून ते नष्ट करण्यात आले आहे.
तत्कालीन अन्न सुरक्षा अधिकारी अंकुश यांनी दूधाचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या अन्न विश्लेषकांकडे पाठविले होते. त्यांनी दिलेल्या अहवालात दूधामध्ये डिर्टजंट भेसळ असल्याचे आढळने आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते अधिक तपास करीत आहेत.