पुणे : स्विझर्लंड येथील जेनेव्हा येथे हाेणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेमध्ये मानवी हक्कासाठी लढा देणारे अॅड.असिम सराेदे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदा व सामाजिक न्यायाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे. विविध देशांमधील कायदेतज्ञांसाेबत विचारविनिमय करण्याची संधी सराेदे यांनी मिळणार असून सराेदे हे संयुक्त राष्ट्रांमध्ये पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर पाकिस्तानबद्दलची भारताची भूमिका मांडणार आहेत. तसेच पाकिस्तानात कशाप्रकारे हिंसेच्या आधारावर राजकारण व मानवी हक्कांची पायमल्ली केली जाते, याची माहिती देखील ते संयुक्त राष्ट्रसंघामध्ये देणार आहेत.
4 मार्च ते 22 मार्च या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाची वार्षिक सभा हाेणार आहे. यात विविध विषयांवर जगभरातील तज्ञ आपले मत व्यक्त करणार आहेत. यात वेगवेगळे सेशन्स असणार असून त्यात काहींना 1 ते 1.50 मिनिटे बाेलण्याची तर काहींना आठ मिनिटापर्यंत आपला विषय मांडण्याची संधी प्राप्त हाेणार आहे. सराेदे यांना आठ मिनिटापर्यंत आपला विषय संयुक्त राष्ट्र संघासमाेर ठेवता येणार आहे. यात ते नुकताच काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर पाकिस्तानबद्दलची भारताची भूमिका मांडणार आहेत. तसेच पाकिस्तानमध्ये हाेत असलेल्या मानवी हक्कांच्या पायमल्लीवर देखील भाष्य करणार असल्याचे त्यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.
लाेकमतशी बाेलताना सराेदे म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघाच्या वार्षिक सभेत सहभागी हाेण्याची तसेच आपली मते मांडण्याची संधी मिळणार आहे याचा अत्यंत आनंद हाेत आहे. येथे वेगवेगळ्या देशांचे लाेक येत असतात. प्रत्येक देशामध्ये कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यात येताे. यात सामाजिक न्याय, मानवी हक्क, कायद्याची अंमलबजावणी कशापद्धतीने हाेते याचे मुल्यांकन केले जाते. त्यातून इतर देशांच्या तुलनेत आपण कुठे मागे पडताेय का याचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. मी काही विषयांवर तेथे बाेलणार आहे, त्यात महिला आणि मुलांची भारतातील परिस्थिती, गुन्हेगारी आणि समाजव्यवस्था, भारतातील मानवी हक्कांची सद्यस्थिती आणि त्यासमाेरील आव्हाने आदी विषयांवर मी बाेलणार आहे.