पुणे : महाराष्ट्रात मानवाधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण विषयाशी निगडीत प्रश्नांवर कायदेशीर चौकटीतून आवाज उठवणारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पुढील सहा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अॅड.सरोदे हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवाधिकार परिषदेसाठी जिनिव्हा येथे गेले होते. तिथून ते काही कामासाठी फ्रान्स येथील ग्रेनोबेल शहरात असताना त्यांना त्रास होण्यास सूरूवात झाली. त्यावर त्यांना तात्काळ सेंटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. जिनिव्हा येथील अति थंड हवामानामुळे त्यांच्या हृदयातील धमन्यांना ३५टक्के सूज आल्याचे निदान झाले. त्यात रक्त गोठल्याने हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाल्याने ब्लॉक निर्माण झाला. या सर्वाचा ताण रक्ताभिसरणावर झाल्याने सरोदे यांची तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून १८ जणांची टीम त्यावर लक्ष ठेवून आहे. अजून साधारण ३ आठवडे त्यांना परदेशात राहावे लागणार असून त्यानंतर येणाऱ्या रिपोर्टवरून त्यांचे भारतात परतणे ठरेल. दरम्यान त्यांच्या पत्नी अॅड. रमा सरोदे या उद्या फ्रान्सला रवाना होत आहे. त्यांनी सरोदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचे कळवले आहे.
अॅड. असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 2:36 PM