पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून अॅड. उमेश मोरे यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या घनश्याम पोपट दराडे या वकिलाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात तो सहआरोपी असून, आरोपीला जामीन दिल्यास पुराव्यांमध्ये छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात केला. तो मान्य करीत न्यायालयाने वकिलाचा जामीन अर्ज फेटाळला.
मे. जी. पी. अगरवाल कोर्टात दराडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून एक ऑक्टोबर २०२० मध्ये अॅड. उमेश मोरे यांचे अपहरण करण्यात आले होते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेले अॅड. मोरे घरी न परतल्याने त्यांचे बंधू प्रशांत मोरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांना अॅड. मोरे यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळून आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर, अॅड. रोहित शेंडे यांच्यासह वकील घनश्याम दराडेला अटक केली होती. दरोडे यानेच अॅड. मोरे कोठे आहे याची माहिती फलके आणि अॅड. शेंडे यांना दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी दरोडे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायालयात बुधवारी (दि. २४) सुनावणी झाली. आरोपीच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. त्यावर युक्तिवाद करताना अॅड. उज्ज्वला पवार यांनी हा आरोपी केदार फालकेच्या सतत संपर्कात होता. अॅड. रोहित शेंडे याने अत्यंत योजनाबद्धपणे खुनाचा कट रचला. दराडे हा अॅड. शेंडेकडे काम करीत होता. या कटात तो त्याला सहकार्य करीत होता. या कटातील त्याचा सहभाग स्पष्ट आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करु नये हा अॅड. पवार यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने दरोडेचा जामीन अर्ज फेटाळला.