पुणे : बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांनी न्यायालयासमोर केलेल्या विविध अर्जांवरील आणि जामिनावरील गुरुवारी (दि. २७) सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी विशेष सत्र न्यायाधीश के. डी. वढणे यांच्या न्यायालयात झाली.पाचही आरोपींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येरवडा कारागृहात ठेवणे सोयीस्कर नाही. दुसऱ्या कारागृहात हलवावे, अशी मागणी येरवडा कारागृह प्रशासनाने केली आहे. अॅड. गडलिंग व शोमा सेन यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पोलिसांची बाजू मांडण्यासंदर्भात अर्ज सादर केला आहे. अॅड. गडलिंग यांना हवे असणाºया पुस्तकांवर उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. जामिनासाठी अर्ज दाखल करून एक महिन्याचा कालावधी होत आहे. त्यामुळे त्यावर लवकर सुनावणी घेण्यात यावी. तसेच कारागृहात कायदेविषयक पुस्तके वाचण्याकरिता मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने पुस्तके देण्यासंदर्भात आदेश दिला असतानाही मला अद्याप पुस्तके मिळाली नसल्याचे अॅड. गडलिंग यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने सांगितले, की अद्याप पुस्तके का मिळाली नाहीत, याबाबत स्वतंत्र चौकशी होईल. नवीन पुस्तकांची काही यादी असेल तर सादर करा. यापुढे न्यायालयाच्यामार्फत पुस्तके पोलिसांकडून तपासणी करून देतील.सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी गडलिंग यांचा आरोप खोडून काढत त्यांच्या वकिलास दोन पुस्तके तपासणी करून दिली होती, अशी माहिती दिली. जामिनावरील युक्तिवाद पूर्ण होण्यासाठी गडलिंग यांना पुस्तक द्या, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले. गडलिंग यांनी न्यायालयात अर्ज सादर करून आपणास कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अंर्तगत डिप्लोमा इन सायबर लॉ करावयाचा असून त्याकरिता परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित पदवीबाबत चौकशी करून कारागृह प्रशासनाने त्यांचे मत मांडावे, असे सांगितले आहे. गडलिंग न्यायालयात स्वत: केस लढत आहेत. बचाव पक्षाच्यावतीने अॅड. शाहिद अख्तर, अॅड. रोहन नहार व अॅड. राहुल देशमुख काम पाहत आहेत. गडलिंग आणि शोमा सेन यांचे जामीन अर्जावर तसेच संबंधित पाच जणांना दुसºया कारागृहात हलविण्याबाबत २७ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.गणेशोत्सवाचा जामिनाशी काय संबंध : गडलिंगशोमा सेन आण गडलिंग यांच्या जामीन अर्जावर गणपती विसर्जनानंतर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी अॅड. पवार यांनी केली. त्यावर अॅड. गडलिंग यांनी आक्षेप घेत गणपती उत्सव आणि जामिनाचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित केला. सुनावणी २१ सप्टेंबरला ठेवण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने सर्वांच्या अर्जावर एकाच वेळी सुनावणी होण्याच्या दृष्टीने २७ सप्टेंबर ही तारीख ठेवल्याचे नमूद केले.
अॅड. गडलिंग व सेन संशयित माओवादी: जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला होणार सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:24 AM