पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार असुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा हाेणार आहे. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 21 एप्रिल राेजी पुण्यातील एस.एस.पी.एम.एस. च्या मैदानावर ही सभा हाेणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सभांना माेठा प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लाेकसभा निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याचा आराेप सातत्याने काॅंग्रेस, राष्ट्रवादीकडून हाेत आहे. तर वंचितचा फायदा हा भाजपलाच हाेईल असे भाजपकडून म्हंटले जात आहे. आंबेडकर हे साेलापूर आणि अकाेला या दाेन्ही मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. साेलापूरमध्ये काॅंग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत तर भाजपाकडून सिद्धेश्वर स्वामी उभे आहेत. आंबेडकरांना साेलापूरमध्ये विविध संघटना तसेच डाव्यांनी सुद्धा पाठींबा दिल्याने साेलापूरची निवडणूक रंगणार आहे.
दरम्यान पुण्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आता चारच दिवस राहिले असल्याने सर्वच पक्ष जाेरदार प्रचार करत आहेत. भाजपाकडून स्टार प्रचारकांना शहरात पाचारण करण्यात येणार आहे तर आघाडीतील अनेक नेते सभा घेणार आहेत. राज ठाकरे हे सुद्धा उद्या सिंहगड राेड येथे सभा घेणार आहेत. राज ठाकरे आपल्या सभांमधून भाजपाच्या विविध याेजनांची पाेलखाेल करत असल्याने उद्याच्या सभेत ते काय नवीन घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.