पुणे : वैद्यकीय क्षेत्रात, निदान करणे अपरिहार्य झाले असून कृत्रिम बुद्धिमत्तेसह वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आरोग्य सेवा पुरविण्यामध्ये क्रांती घडली आहे, असे प्रतिपादन हेल्थकेअर फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. हर्ष महाजन यांनी केले. तसेच प्रगत तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या महागडे आहे. परंतु, याची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात हे तंत्रज्ञान कमी किमतीत उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंबायोसिस स्कूल फॉर ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (एसएसओडीएल), सिंबायोसिस विद्यापीठातर्फे आयोजित ''सिमहेल्थ २०२१'' या दोन दिवसीय परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व प्र. कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिसच्या कुलगुरू, डॉ. रजनी गुप्ते, आरोग्य विज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, सिंबायोसिस स्कूल फॉर ओपन अँड डिस्टन्स लर्निंगचे संचालक डॉ. अभय सराफ उपस्थित होते.
डॉ. देवी शेट्टी यांनी पीपीई किट, व्हेंटिलेटर आणि सध्याच्या ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करून नजीकच्या काळात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल जागरूक केले. तसेच नजीकच्या काळात आपल्याला डॉक्टर्स, नर्सेस आणि आयसीयू बेड्सचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. येत्या काही आठवड्यात आपल्याला सुमारे दिड लाख डॉक्टर्स, दोन लाख नर्सेसची आवश्यकता भासणार आहे. केवळ डॉक्टर्स आणि नर्सेस रूग्णांना बरे करण्यास पुरेसे नसून कोविड रुग्णांवर पुढील काही आठवड्यांमध्ये उपचार करण्यासाठी आपल्याला पाच लाख अतिरिक्त आयसीयू बेड्सची देखील आवश्यकता असणार असल्याचे यावेळी सांगितले.
डॉ. शेट्टी म्हणाले, पहिल्या लाटेच्यावेळी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी प्रचंड काम केले म्हणूनच आता दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपल्याला समांतर वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याची नितांत गरज आहे. भारत सोडून जगातील इतर कोणताही देश इतक्या मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचारी तयार करू शकत नाही. कोवीड आयसीयूमध्ये तरुण डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी काम करण्याची गरज असून त्यांचे लसीकरण केले पाहिजे.