धनकवडी : भर समुद्रातील उत्तुंग सूळ सुळका सर करणे, ही गिर्यारोहणातील अत्यंत अवघड कामगिरी समजली जाते; परंतु पुण्यातील एस. एल. एडवेंचरच्या मावळ्यांनी रत्नागिरीच्या भर समुद्रातील एकमेव सूळ हा उत्तुंग सुळका तितक्याच लीलया सर केला जितक्या सहजतेने गडकिल्ले आणि इतर सुळके सर करतात. या खडतर मोहिमेचे सर्वत्रच कौतुक होत आहे.एव्हरेस्टवीर लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एल. एडवेंचरच्या मावळ्यांनी कोकणातील रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उभा असलेला एकमेव सुळका सर करण्याचे मोठं आव्हान स्वीकारले आणि समुद्रकिनारपट्टीजवळील खडक, जोराने धडकणाऱ्या लाटा, दमट वातावरण, ठिसूळ खडक आणि घोंगावणारा वारा यामुळे ही मोहीम खरं तर जोखमीची होती आणि समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीमुळे तितकीच जिकिरीची देखील होती.मात्र, तरीही गिर्यारोहक अरविंद अनंत नवेले व अमरीश ठाकूर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेमध्ये एकूण तेरा गिर्यारोहकांनी सहभाग घेत यशस्वी चढाई केली.अशी झाली मोहीममोहिमेतील सदस्यांनी पुणे येथून रात्री १२:३० वाजता रत्नागिरीसाठी प्रवास चालू केला. सकाळी ९:०० वाजता सर्वजण सुळक्याच्या पायथ्याला पोहोचले. तुषार दिघे व योगेश काळे यांनी सुळका सर करण्यासाठी सुरुवात केली. काही वेळेतच या दोघांनी सुळक्याचा माथा गाठण्यास यश मिळवले. त्यानंतर शैलेश थोरवे, संकेत दिघे, केदार खरडे, हृतिक खैरे यांनी मागोमाग सुळका सर केला. दुपारी उन्हाचा तडाखा वाढत चालला होता व समुद्राला आलेल्या भरतीमुळे काही गिर्यारोकांना चढाई करण्यासाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर प्रसाद बागवे, तेजस नाईकवाडे, अमित वैद्य यांनी चढाई केली.या मोहिमेच्या सर्व जबाबदाऱ्या स्वप्नाली उघडे व श्रेया बोडके यांनी उत्तम प्रकारे सांभाळल्या. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे एस. एल. एडवेंचरला हा समुद्री सुळका सर करणे शक्य झाले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, मोहिमेत सहभागी झालेल्या ६ वर्षीय बाल गिर्यारोहक रोम लहू उघडे याने पहिल्याच प्रयत्नातच हा सुळका यशस्वीरीत्या सर केला.
रत्नागिरीच्या भर समुद्रातील उत्तुंग सूळ सुळक्यावर एडवेंचरच्या गिर्यारोहकांनी केली यशस्वी चढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:14 IST