पुणे: शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करावी अशी सुचना शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिल्या आहेत. दरम्यान, शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाची नाेंद करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, रिक्त जागांची तत्काळ निश्चिती पूर्ण करीत रिक्त आरक्षणाच्या पदांची माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध करून द्यावी असेही पत्रात नमूद आहे.
राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी https://tait2022. mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दि. १६ ऑक्टाेबर पासून उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सीईओंनी नियुक्ती प्राधिकारी म्हणून पोर्टलवरील सूचना व वेळोवेळीचे शासन निर्णय विचारात घेत रिक्त असलेले आरक्षण व जिल्हयातील विषयनिहाय रिक्त पदे नमूद करुन जाहिरात द्यावी. आरक्षणनिहाय रिक्त पदे, गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पडताळणी करुन जाहिरात देण्यासाठी माहिती तयार ठेवावी तसेच शिक्षक पदभरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनांनुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे दि २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयाेजन केले हाेते. परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करुन घेतले आहेत. तसेच संचमान्यता आणि सर्व जिल्हा परिषदांची बिंदूनामावली तपासून घेण्यात आली. कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीच्या सहाव्या टप्प्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या रिक्त असलेली पदे विचारात घेण्यात येत असल्याने शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाची नोंद करता येत नाही. सदरच्या रिक्त जागांची निश्चिती तात्काळ पूर्ण करुन जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाच्या पदांची माहिती उपलब्ध करुन घ्यावी.
सीईओंनी माहिती पडताळून घ्यावी
पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पोर्टल नोंद करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉगीनवर दिलेली आहे. त्यांनतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नोंद केलेली माहिती आपण पडताळणी करुन योग्य असल्यास रोस्टर व विषयनिहाय रिक्त पदासाठी आपल्या लॉगीनवर मान्य करून घ्यावी. त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉगीनमध्ये जात जरेट अॅडव्हर्टीजमेंट वर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदाची जाहिरात जनरेट होईल.