पुणे : साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीचा कायापालट करण्यात येणार असून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. या अंतर्गत मुळा-मुठा नद्यांचे जलशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे, त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक मान्यता मिळविण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्यात येणार आहे.पुणे शहरातून १७ किलोमीटर लांबीचा मुळा नदीचा तर १२ किलोमीटर लांबीचा मुठा नदीचा प्रवाह जातो. नदीकाठी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आल्हाददायक वाटेल, अशा सुधारणा केल्या जाणार आहेत. याचा आराखडा तयार करण्याचे काम सल्लागार कंपनीकडून करण्यात येणार असून त्याकरिता त्यांना ३ कोटी ९६ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली. जिल्हाधिकारी, पुणे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, खडकी कॅन्टोन्मेंट, आणि सीपीडब्ल्यूआरएस या सर्व विभागांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. मुळा-मुठा नदी आणि नदीकाठाची सुधारणा करणे, तांत्रिक पद्धतीने नदीचे संरक्षण करणे, नदीकाठ सुधारणेसाठी योग्य असणारे प्रकल्पांची उभारणी करणे, नद्यांचे सर्वसमावेशक पद्धतीने विकसन करण्याच्या दृष्टीने जलशास्त्रीय सर्वेक्षण करणे, विकसनासाठी स्वतंत्र डिझाईन करणे आदी कामे सल्लागारांकडून केली जाणार आहेत. या कामांची जसजशी पूर्तता होईल, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सल्लागाराला रक्कम दिली जाणार आहे.नदीपात्रामध्ये रस्ता उभारणे व इतर कामे हाती घेण्यात आल्यानंतर त्याला पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे अशा कामांमध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे ही कामे सुरू करण्यापूर्वीच पर्यावरणवादी सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी समिती स्थापन करण्याची उपसूचना प्रस्तावासमवेत मंजूर करण्यात आली.
नदीकाठच्या विकासासाठी सल्लागार कंपनी
By admin | Published: December 03, 2015 3:33 AM