दावडी : अपु-या एसटी बसेस तसेच वेळेवर येत नसल्याने आज विद्यार्थी व ग्रामस्थांनी संतप्त होऊन रेटवडी (ता. खेड) येथे एसटी बस अडवून आंदोलन केले.राजगुरुनगर आगाराच्या एसटी बस वेळेवर येत नाहीत. तसेच रेटवडी येथे बसथांबा असूनही एसटी बस थांबत नाही. मागील वर्षी राजगुरुनगर ते रेटवडी अशी जादा एसटी बस आगाराने सुरू केली होती. मात्र कित्येक महिन्यांपासून आगाराने ती बंद केल्यामुळे आज विद्यार्थी व ग्रामस्थ संतप्त होऊन अर्धा तास एसटी बस अडविली.यापुढे उद्यापासून एक जादा बस पाठवली जाईल, असे आश्वासन राजगुरुनगर एसटी आगाराने दिल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात रेटवडीचे सरपंच नामदेव डुबे, विजय पवळे, अतुल काळे, चंद्रकात पवळे, यांच्यासह शुभम पवळे, संकेत पवळे, सूरज पवळे, निकिता पवळे विद्यार्थी सहभागी झाले होते.पाबळ, कनेरसर व रेटवडी वाडी-वस्तीवरील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी राजगुरुनगरला जात असतात. विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाचा रीतसर पास काढलेला आहे. परंतु गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे त्यातच अभ्यासक्रम बुडू नये, म्हणून विद्यार्थी खासगी वाहनाने राजगुरुनगरला येतात.एसटीचा पास असतानादेखील विद्यार्थ्यांना खासगी गाड्यांचा अतिरिक्त आर्थिक फटका सोसावा लागतो.या मार्गावर येताना व जाताना वेळेवर गाड्या सोडाव्यात,म्हणून वेळोवेळी एसटी महामंडळाला सूचनादेखील करण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज आंदोलन करण्यात आले.
रेटवडीत विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस, अपु-या सेवेमुळे गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 2:16 AM