पुणे : एका सॉफ्टवेअर कंपनीने चित्रपटासंबंधीचा टेÑलर दाखविण्यासाठीच्या अॅप्लिकेशनची बॅकअप सिस्टीम हॅक करून त्यामधील दहा हजार रुपयांच्या व्हाउचर्सची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला सायबर क्राईम सेलने कर्नाटक येथून अटक केली.राहुल पी. हरिहरन (वय २२, रा. वनश्री हॉस्टेल, सिरसी, जि. कारवार, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वैभव भार्गव (वय ३६, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पोडियम सिस्टीम प्रा. लि. नावाची सॉफ्टवेअर कंपनीने चित्रपट संबंधीचे टेÑलर दाखविण्यासाठी ‘रिव्ह्यू देदे’ या नावाचे अॅप्लिकेशन तयार केले होते. हे अॅप जास्तीत जास्त लोकांनी डाऊनलोड करून वापरण्यासाठी फिर्यादी यांनी ग्राहकांसाठी आॅफर व बक्षिसे ठेवली होती. हे अॅप आरोपीने डाऊनलोड करून फिर्यादीच्या परवानगीशिवाय स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता ‘रिव्ह्यू देदे’ या अॅप्लिकेशनची बॅकअप सिस्टीम हॅक करून त्यामधील पीव्हीआर सिनेमाचे ६७, कार्निव्हल सिनेमाचे २६ व शॉपर्स स्टॉपचे १३० व्हाउचर असे एकूण २२३ व्हाउचर्स चोरी केले.यापैकी पीव्हीआरचे एकूण ९००० रुपयांचे ३० व्हाउचर्स आणि शॉपर्स स्टॉपचे १५०० रुपयांचे ५ व्हाउचर्स असे सर्व मिळून एकूण १० हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक आरोपीने केली. तसेच सिस्टीम हॅक कशी करायची, अशा स्वरूपाचे एसएमएस पाठविण्यात आल्याने त्याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस उपनिरीक्षक सोनाली फटांगरे, पोलीस हवालदार अस्लम अत्तर, दीपक भोसले, संतोष जाधव, राहुल हंडाळ आणि शाहरूख शेख यांनी ही कामगिरी केली.या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलने केला. त्यामध्ये आरोपी हा कर्नाटक सिरसी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सेलने सिलसी येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तपासात आरोपीने ‘रिव्ह्यू देदे’ हे अँड्रॉईड अॅप स्वत:च्या मोबाईलमध्ये डाऊनलोड व इन्स्टॉल करून घेतले. त्यानंतर थर्ड पार्टी व्हर्नेबिलिटी सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या अॅपच्या त्रुटी शोधल्या. यात अँड्रॉईड अॅपमध्ये डाटा इंस्क्रिप्शनमध्ये कोणतीच काळजी घेतली नसल्याची त्रुटी आढळली. या त्रुटीचा गैरफायदा आरोपीने घेत अॅपच्या युजरचा सर्व डाटा व गिफ्ट व्हाऊचर स्वत:कडे वळवून घेतल्याचे उघड झाले.
अॅप्लिकेशन हॅक करून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:18 AM