मुंढवा : पुणे महानगरपालिकेत ठेकेदारी पद्धतीने काम करणा-या कर्मचा-यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने हे सर्व कामगार हतबल झाले आहेत. पगारच नाही तर साहेब आम्ही जगायचं कसं, संसाराचा गाडा चालवायचा तर पैसे लागणारच अशी व्यथा हे कर्मचारी मांडत आहेत. तरी संबंधित विभागाने या कर्मचा-यांचे पगार त्वरित करावेत अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम लोणकर यांनी केली आहे. प्रभाग क्र.२२ मध्ये मुंढवा परिसरात पुणे महानगरपालिकेत स्वच्छता विभागात ठेकेदारी पद्धतीने १० पुरुष व ६ स्त्रिया काम करत आहेत. हे सर्व कर्मचारी या विभागात झाडू मारणे, बिगारी काम, कचरा विघटनाचे काम करत आहेत. ठेकेदारी पद्धतीने काम करत असल्यामुळे पगार वेळवर होत नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. पगारासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. यात सर्व कर्मचा-यांना तब्बल चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यात महिला व पुरुषांचा समावेश आहे. पगारच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार असा प्रश्न या कर्मचा-यांवर ओढावला आहे. आज किंवा उद्या पगार होईल या आशेने सर्व कर्मचारी काम करीत आहेत. या महागाईच्या जमान्यात ठेकेदारी पद्धतीने का होईना हे काम मिळाले आहे तर हे काम कसे सोडणार..अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. आमचा पगार फक्त लवकर मिळावा हीच माफक अपेक्षा हे कर्मचारी करताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम लोणकर म्हणाले, या कर्मचा-यांना पगार मिळावा यासाठी मी महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले होते. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार मिळवून दिला. परंतु, आता तब्बल चार महिने झाले तरी या कर्मचा-यांचा पगार संबंधित विभाग देत नाही. या कर्मचा-यांचे हातावर पोट आहे. निदान त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन तरी त्यांचा पगार त्वरित करावा अशी आमची मागणी आहे.यासंदर्भात आरोग्य निरीक्षक प्रविण गायकवाड म्हणाले, या कामांची वर्क आॅर्डर निघालेली नव्हती. मात्र, ती वर्क आॅर्डर आता मिळालेली आहे. ठेकेदार बदलला आहे. येत्या तीन-चार दिवसात सर्व कर्मचा-यांना धनादेश मिळुन जाईल. त्यांचा पगाराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. ....................
मुंढव्यातील ठेकेदारी कर्मचा-यांना चार महिन्यांपासून पगारच नाही.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 7:03 PM
पगारच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार असा प्रश्न या कर्मचा-यांवर ओढावला आहे. यात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ठळक मुद्देआम्ही जगायचं कसं- कामगारांनी मांडली व्यथा कर्मचा-यांना पगार मिळावा यासाठी मी महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन