पुणे : लाेकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे प्रथमच खासदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात मंत्री पदाची लॉटरी लागली. पुण्याचे माजी खा. सुरेश कलमाडी १९९५-९६ या काळात रेल्वे राज्यमंत्री होते. त्यानंतर २८ वर्षांनी पुण्यातून निवडून गेलेली व्यक्ती केंद्रात मंत्री होत आहे.
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खा. मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. पुणे शहरातून यापूर्वी काँग्रेसचे काकासाहेब गाडगीळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया, सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवले आहे.
मूळचे पुण्याचे असलेले प्रकाश जावडेकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ साली पर्यावरणमंत्री होते; पण जावडेकर हे राज्यसभेतून खासदार झाले होते. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपदी संधी दिली आहे.राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. या पार्श्वभूमीवर कोरी पाटी असलेला आश्वासक चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांना मंत्री करण्यात आले आहे.
प्रथम खासदार ते मंत्री
पुणे शहरातून यापूर्वी काँग्रेसचे काकासाहेब गाडगीळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया, सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवले आहे. पुणे लोकसभेतून मुरलीधर मोहोळ हे प्रथमच निवडून आले आहेत. या पहिल्या टर्ममध्येच त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मोहोळ यांच्या रूपाने प्रथमच पुण्यातील मराठा जातीच्या खासदाराला संधी मिळाली आहे.
मला केंद्रात मंत्रिपद मिळत आहे, हा पुणे शहराचा सन्मान आहे. पुणेकरांनी मला निवडून देऊन आशीर्वाद दिला आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बुथवरील कार्यकर्त्याला संधी दिली. याबद्दल मी पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानतो. महाराष्ट्र सदनमध्ये मी आराम करत होतो. त्यादिवशी सकाळी मला नऊ वाजता फोन आला. तेव्हा मला कळलं की, मी मंत्री होणार आहे. आता माझी जबाबदारी वाढली आहे. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री