बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीनंतर ‘डीवायएसपी’ना जाग आली आहे. उपविभागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. अवैध व्यावसायिकांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
अवैध दारु, मटका, जुगार, अंमली पदार्थ यांविषयक तक्रार करण्यासाठी माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक ९०११९६०२०० या क्रमांकावर थेट संपर्क साधावा, असे आवाहन गणेश इंगळे यांनी केले आहे. बारामती तालुक्यात एका गावातील अवैध दारु विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी(दि १४) कार्यक्रमात निवेदन देत लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना ‘मी तुम्हाला चांगले ‘डीवायएसपी’ म्हणुन बारामतीत आणले होते.बारामतीच्या कोणत्याहि भागात चालणारे अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना देत नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडुन जागे झाल्याचे चित्र आहे. पोलिस आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी आपल्या पथकाच्या मदतीने अवैध व्यावसायिकांचा शोध घेत कारवाईला सुरवात केली आहे. बारामती शहर परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी व त्याचे रसायन पोलिसांना मिळाले. यातील तिघांना अटक करण्यात आली असून दोघे जण पळून गेले. हनुमंत बबन लाड (वय ४३, रा. बांदलवाडी ता.बारामती), मंगेश बबन लोंढे (रा.सुहासनगर आमराई ता.बारामती) या दोघांसह इतरही तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पुढील काळात अवैध गावठी हातभट्टी चालविणा-यांच्या घरातील कुटुंबियांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. बारामती व इंदापूर तालुक्यातील अवैध दारुव्यवसाय करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही सुरु झाली आहे. असे वारंवार गुन्हे करणा-या व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे. अवघ्या दोनच दिवसात पोलिसांनी तब्बल २१ गुन्हे दाखल केले असून २४ जणांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे रोडसाईड रोमिओंवरही पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. दोन दिवसात ३० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या पुढील काळात संध्याकाळच्या वेळेस पोलीस पथक शहरात फिरुन रोडसाईड रोमिओंवर कारवाई करण्यात येणार आहे.