येडगाव : शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यास अखेर १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. हे आर्वतन ४० दिवस चालणार आहे. रब्बीच्या पहिल्या आर्वतनांतर्गत ६० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग कार्यालयातून मिळाली.रब्बीचे आवर्तन सोडण्यास विलंब होऊ लागल्यामुळे कुकडी प्रकल्पातून तत्काळ आवर्तन सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत होती. सोमवारी सायंकाळी कुकडी डावा कालव्यास ५०० क्युसेक्सने पाणी सोडून त्यामध्ये वाढ करीत मंगळावारी १० वाजता १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यांतील पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.प्रकल्पात मागील वर्षीपेक्षातीन टीएमसी कमी पाणी साठा असल्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात किती आवर्तन होणार, यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पाटबंधारे विभागाकडून सध्या कुकडी प्रकल्पातून रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचे नियोजन केले.(वार्ताहर)
अखेर कुकडी डावा कालव्यास सोडले पाणी
By admin | Published: November 05, 2014 5:36 AM