चासकमान : चासकमान धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाशी, शेतकरी मात्र उपाशी’ या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन धरणातून ३०० क्युसेक्सने सोमवारी दुपारी दोन वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कमान, मोहकल, कडधे, वेताळे, चास, दोंदे, राजगुरुनर, वडगावसह १० गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.चासकमान परिसरातील नदीपात्र पाण्याअभावी कोरडे पडले होते. यामुळे नदी परिसरातील पिके पाण्याअभावी धोक्यात आल्याने परिसरातील शेतकरी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करीत होते. नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार आहे. नदीकाठच्या गावांच्या नळपाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. धरणातून पाणी सोडल्याने राजगुरुनगरचा केदारेश्वरचा बंधारा भरणार आहे. चासकमान धरणाजवळील नदीचे पात्र तसेच विहिरी, बंधाऱ्यांनी तळ गाठला होता. यामुळे पाणीप्रश्न गंभीर झाल्याने नेहेरे शिवार, डांगले शिवार, पांगरी, बुट्टेवाडी, दोंदे आदी गावांच्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता.
अखेर चासकमान धरणातून पाणी सोडले
By admin | Published: April 11, 2017 3:43 AM