आळंदी : अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारी, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पाटबंधारे विभागाकडून कोरड्या पडलेल्या इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे भाविकांची गैरसोय दूर झाली आहे.याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा करत पाण्याअभावी भाविकांच्या होत असलेल्या गैरसोयी मांडल्या होत्या. याची दखल घेत परिस्थिती ओळखून प्रशासनानेदेखील यंदा नेहमीपेक्षा आठवडाभर अगोदरच इंद्रायणीत पाणी सोडले आहे.या वर्षी जोरदार पाऊस झाला असला, तरी इंद्रायणी नदीपात्र कोरडे पडले होते. कार्तिकस्नानपर्व सुरू असल्याने तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा राबता होता. मात्र इंद्रायणी घाटावर नदीत स्नान करण्याजोगे पाणीच नसल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. घाटावर स्नान करून माऊलींचे दर्शन घेण्याचा भाविकांचा नित्यनेम पाण्याअभावी चुकत होता. ‘लोकमत’ने ३ नोव्हेंबरला ही समस्या मांडली होती. याची दखल घेत नगरपालिकेच्या वतीने तातडीने पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. याची दखल घेऊन प्रशासनाकडून इंद्रायणीत पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. दोन दिवसांपासून इंद्रायणीत पाणी सोडण्यात येत असून, कोरडी पडलेलली इंद्रायणी खळाळून वाहात आहे. मात्र, या पाण्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहून आली असून, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका भागातील दूषित पाणी मिसळल्याने पाण्याला काळसरपणा आलेला दिसून येतो. पण आता पाणी आल्याने भाविक आनंद व्यक्त करीत असताही, इंद्रायणीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याची खंत व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
अखेर इंद्रायणीत सोडले पाणी
By admin | Published: November 18, 2016 6:06 AM