पुणे : एकेकाळी पुणे महापालिकेवर एकहाती वर्चस्व राहिलेले माजी खासदार सुरेश कलमाडी हे पुणे फेस्टिव्हलच्या काही मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. ५) सकाळी महापालिकेत आले हाेते. त्यांनी आयुक्तांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेतील जुन्या आठवणी काढताच कलमाडी यांच्यासह पदाधिकारीही गहिवरले हाेते.
महापालिकेच्या प्रत्येक समितीचा विषय कलमाडी यांच्याकडे असे. ते म्हणतील तोच निर्णय घेतला जात असे. कलमाडी म्हणजेच महापालिका असे समीकरण झाले होते. तत्कालीन खासदार, त्यानंतर काही काळ रेल्वे राज्यमंत्री असलेल्या कलमाडी यांनी अनेक पदे भूषवली, मात्र पालिकेवरील पकड कधीच ढिली होऊ दिली नव्हती.
काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कलमाडी विमानतळावर आले की महापौरांसह सगळे पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी म्हणून तिथे थांबलेले असत. शहरातील अनेक नव्या योजनांचे कलमाडी प्रवर्तक आहेत. महापालिकेच्या माध्यमातून ते या सगळ्या योजना मंजूर करून घेत असत. मुख्य सभेतील सर्व विषय त्यांच्या मान्यतेनंतरच पुढे सरकत. अनेक विषय तर त्यांनीच दिलेले असत. त्यावर काय निर्णय घ्यायचा तेही कलमाडी सांगत असत अशी माहिती महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्याने दिली.
खासगी वर्तुळात कलमाडींना भाई म्हणतात. त्यानंतर ते राजकारणातही पुण्याचे भाईच झाले. त्यांच्या सांगण्याशिवाय महापालिकेतील पानही हलत नसे. विरोधक तर बाजूलाच पण स्वपक्षातील नाराजांचाही त्यांनी कधीच पर्वा केली नाही. त्यांच्या या पद्धतीने अनेक माणसे दुखावली. मात्र त्यांच्या अडचणीच्या काळात स्वत:हून त्यांना मदत करत कलमाडी पुन्हा त्यांना आपलेसे करून घेत.
मॅरेथॉन, पुणे फेस्टिवल, राष्ट्रकूल स्पर्धांसाठी बालेवाडी क्रीडा संकूल अशा अनेक योजना, कार्यक्रम राबवून कलमाडी यांनी पुणे शहराला देशाच्याच नाही तर जगाच्या नकाशावर नेले. या सगळ्यात त्यांना महापालिकेकडून नेहमीच मोठी आर्थिक मदत होत असे. त्यामुळेच त्यांनी महापालिकेतील वर्चस्व कधीच कमी होऊ दिले नाही असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट झाल्यावर कलमाडी यांनी त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. पुणे फेस्टिवलचे कार्यक्रम होणार असलेल्या ठिकाणी राडारोडा, कचरा झाला आहे. अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाच्या दारातच डबरचे ढीग आहे. यावर त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली. आयुक्तांनी त्यांना यावर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे. माजी गटनेते आबा बागूल, माजी नगरसेवक अविनाश बागवे, फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रकूल क्रीडा घोटाळ्यात नाव आल्यानंतर काँग्रेस पक्षाने कलमाडी यांच्यावर पक्षातून निलंबन करण्याची कारवाई केली. त्यानंतर कलमाडींचा विजनवास सुरू झाला. त्यातच ते आजारी पडले. त्यामुळे त्यांचा सार्वजनिक संपर्क तुटून गेला. काँग्रेसचे त्यांचे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी घरी जाऊन त्यांची भेट घेत. शुक्रवारी बऱ्याच वर्षांनी कलमाडी थेट महापालिकेतच आल्याने पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकारी चकित झाले. त्यांनीही अनेकांची नाव घेत त्यांना ओळखले व काय, कसे आहात अशी विचारणाही केली.