बारामती : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा सण. मराठी नववर्षाची सुरुवात या सणापासून सुरू होते. आज बारामती शहरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा झाला. नोटाबंदीनंतर प्रथमच आजच्या दिवशी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे वाहन उद्योगातील सुत्रांनी सांगितले. यामध्ये सायंकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार ४०० पेक्षा अधिक कार, तर जवळपास ८०० दुचाकींची गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर विक्री झाली. त्यामुळे बाजारपेठेत आज अनेक दिवसानंतर उत्साहाचे वातावरण दिसून आले.घरोघरी गुढ्या उभारून गोडधोड पदार्थ करून, तसेच साडेतीन मुहूर्तातला हा एक मुहूर्त व मराठी नववर्षाची सुरुवात असल्यामुळे नवनवीन वस्तू खरेदी चा आज सर्वत्र होता. सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी, पाडवा हे साडेतीन मुहूर्ताचे शुभ दिवस आहेत. आज घरोघरी दारावर गुढीला वस्त्र, त्यावर तांब्याचा कलश, कडुलिंबाची पाने व साखरेच्या घाट्या लावून सुंदर अशा गुढ्या उभारल्या होत्या. तर काहींनी आपल्या दुचाकी,चारचाकी वाहनांवर गुढ्या उभारल्याचे दिसत होते. विविध कंपन्यांच्या ४०० हुन अधिक कार, तर जवळपास ८०० दुचाकींची आज विक्री झाली. इलेक्ट्रॉनिक दुकानांमधुन टीव्ही, फ्रिज, डीव्हीडीसह मोबाईलला मोठी मागणी होती. हीरो, सुझुकी, होंडा, बजाज तसेच टी.व्ही.एस.च्या नवीन मॉडेल्सला बाजारामध्ये मागणी होती. तसेच, मोबाईलमध्ये ‘४-जी’च्या हॅण्डसेटला जास्त प्रमाणात मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. विविध ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन दुकाने, तसेच बांधकाम व्यवसायातील बंगल्यांचे, रो हौसिंगचे भूमिपूजनाचे कार्यक्रम आज पार पडले. नोटाबंदीनंतर आलेल्या आर्थिक मंदीचे सावट आता दूर होत आहे, असे चित्र आज दिसून आले. बारामती शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांनी देखील गुढीपाडव्यानिमित्त विशेष सवलत दिली आहे. या सवलतीचा फायदा करून घेण्यासाठी ग्राहकांनी आज पाडव्याच्या मुहुर्तावर आपल्या स्वप्नातील घर साकारण्यावर भर दिला. शहरातील बोराडे असोसिएट्स, संघवी कन्स्ट्रक्शन, मुक्ती कन्स्ट्रक्शन, निर्मिती ग्रुप, यादगार सिटी, श्रीदत्त डेव्हलपर्स, देवळे कन्स्ट्रक्शन, चव्हाण बिल्डर्स, सोहम इंटरप्रायझेस, देवराज बिल्डर, पांडुरंग प्रेस्टीज आदी बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांना ग्राहकांनी पसंती दिली.
नोटाबंदीनंतर पाडव्यानेच दिला हात
By admin | Published: March 30, 2017 12:03 AM