पुणे : बँकेकडून केवायसी अपडेट करण्याचे पत्र आल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो बँकेकडून आल्याचे समजून महिलेने त्यावरील लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी अडीच लाख रुपये ऑनलाईन गंडा घातला.
याप्रकरणी विमाननगर येथील एका ४२ वर्षाच्या महिलेने विमाननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ७ जून रोजी ऑनलाईन घडली.
या महिलेचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हडपसर येथील शाखेत बचत खाते आहे. यापूर्वी त्यांना बँकेकडून केवायसी अपडेट करण्याबाबत रजिस्टर पोस्टामार्फत पत्र आले होते. त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरुन त्यांना मेसेज आला. त्यात तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट सस्पेंड केले आहे. खालील लिंक करुन तुमचे केवायसी व्हेरिफिकेशन पुन्हा करा, असे सांगून त्यात एक लिंक दिली होती. बँकेचे पोस्टाने आलेले पत्र आणि आताचा मेसेज पाहिल्यावर या महिलेला हा मेसेज बँकेनेच पाठविला असल्याचा समज झाला. त्यानंतर तिने दिलेली लिंक ओपन केली. लिंक ओपन करताच तिच्या अकाऊंटवरुन कोणीतरी १४ वेळा ऑनलाईन व्यवहार करुन २ लाख ५० हजार ५५८ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. सावधान, बँक कधीही पत्र पाठवत नाही
यापूर्वी बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरटे लोकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन त्यांना गंडा घालत होते. तेव्हा बँकांकडून सातत्याने जनजागृती करुन बँकेकडून कोणत्याही बाबतीत ग्राहकांना फोन करुन माहिती विचारली जात नाही, असे सांगितले गेले. त्याचा परिणाम आता अशाप्रकारचे फसवणुक होण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले होते. त्यावर आता सायबर चोरट्यांनी नवा फंडा काढलेला दिसून येत आहे. बँकेसारखेच पत्र तयार करुन अगोदर बँकेच्या ग्राहकांना घरी पत्र पाठवायचे आणि त्यानंतर मेसेज पाठवू लागले आहेत. बँकेचे पत्र आले असल्याने त्यांना मेसेज खरा वाटून ते आलेली लिंक उघडून पाहू लागले आहेत. बँक कोणत्याही कारणासाठी ग्राहकाला घरी पत्र पाठवत नाही. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.