बारामती : बारामतीकरांच्या मागे लागलेले कोरोनाचे शुक्लकाष्ठ काही थांबण्याची चिन्हे नाही. प्रांताधिकाऱ्यांपाठोपाठ बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे कोरोनाबाधित झाल्या आहेत.
शहर आणि तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे.या महिन्यात कोरोनाच्या बारामती प्रवेशाला एक वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे.या एक वर्षाच्या कालावधीत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असताना कोरोनापासुन सुरक्षित असलेल्या पदाधिकाऱ्यांना आता कोरोनाने घेरले आहे.बारामतीत २४ फेब्रुवारी रोजी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे कोरोनाबाधित झाले होते. त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे.
मात्र, प्रांताधिकारी यातुुन बाहेर येईपर्यंत नगराध्यक्षांना कोरोनाने गाठले आहे. नगराध्यक्षा तावरे यांचा मंगळवारी(दि २ मार्च)रात्री कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, बारामतीत गेल्या २४ तासात ४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.यामध्ये शहर २२,तर ग्रामीणमध्ये १९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. बारामतीतची आजपर्यंतची कोरोना रुग्णसंख्या ६,८९४ वर पोहचली आहे.त्यापैकी ६,४०३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकुण १४६ जणांचा आजपर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खोमणे यांनी दिली.————————————————