पुणे : हळदीच्या कार्यक्रमात गोंधळ व स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने टोळक्याने ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकासह इतरांना मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने आजोबांनी नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. वराच्या गळ्यात हाराऐवजी बेड्या पडल्या.
ज्ञानेश्वर साळुंखे (वय ७०, रा. नवी खडकी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय ४७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले (वय २६), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय १८), यश मोहिते (वय १९), शाहरुख खान (वय २६), जय तानाजी भडकुंभे (वय २२) यांना अटक केली आहे. सादीक शेख, सनी धुमाळ (सर्व रा. जिजामातानगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नवी खडकी येथे २८ मे रोजी रात्री साडेनऊ ते सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी राहणारा चेतन बेले याच्या लग्नाचे हळदीचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी खूप गोंधळ व आवाज होता. त्यामुळे ज्ञानेश्वर साळुंखे हे आवाज करु नका, आम्हाला त्रास होत असे सांगण्यास गेले असता, आरोपींनी त्यांना अपमानीत करुन हाकलून दिले. त्यानंतरही गोंधळ चालू होता. त्यामुळे ते नंतर पुन्हा सांगण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. त्यांनी फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडिल ज्ञानेश्वर साळुंखे यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे होणार्या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. हळदी, सत्यनारायण, लग्नाच्या कार्यक्रमात मोठमोठ्या आवाजात डिजे लावून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरु असतो. लोकांना त्रास सहन करायला लागतो, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही.