पुणे :हडपसर येथील शेवाळवाडी येथे दोन तरुणीने आत्महत्या केल्याचे घटनेने खळबळ उडाली. एकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना तिच्या मैत्रिणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सारिका हरिश्चंद्र भागवत (वय १९, रा. क्रिस्टल सोसायटी, शेवाळवाडी) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय १९ रा. मराठी शाळेसमोर, शेवाळवाडी) अशी या आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे आहेत. हा प्रकार शेवाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील क्रिस्टल सोसायटीत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
हडपसरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका आणि आकांक्षा या दोघी बाल मैत्रिणी होत्या. सारिका हिने आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी पोहचले. सारिका हिची मैत्रिणी आकांक्षाही तिथे पोहचली.
सारिका हिचा मृतदेह रुग्णावाहिकेतून घेऊन जाण्यात येणार होता. त्याचवेळी आकांक्षा ही त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेली. तेथून तिने खाली उडी मारली. ती सारिकाला नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेजवळच पडली. उंचीवरुन पडल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. सारीका हिने का आत्महत्या केली व तिने आत्महत्या केल्याचे समजल्यावर आकांक्षा हिनेही आपला जीव संपविला, यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप समजले नाही.