पुणे : दिवाळी सणाला महिनाभराचा अवकाश असला तरी मुठा कालवा फुटल्यामुळे झालेले नुकसान तातडीने भरून येणारे नाही. भलेही पालिका व शासनाकडून मदत केली जात होत असली तरीदेखील कमी कालावधीत घरे कशी उभी करायची, हा प्रश्न मुठा कालवा अपघातातील पीडितांसमोर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वयंसेवी संस्था, प्रशासन यांच्याकडून करण्यात आलेल्या मदतीमुळे पीडितांचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या सगळ््यात होणारे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान, त्यांच्या अडचणीवर मार्ग काढण्याचे आव्हान उभे पीडितांसमोर आहे.
‘‘त्या’’ घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही त्या परिसरातील नागरिकांच्या मनात ती घटना घर करून आहे. दुसरीकडे मुठा कालव्यातील पीडितांना आधार देण्यासाठी आता पालिकेच्या कर्मचारी झटून कामे करताना दिसत आहेत. त्यांना हातभार लावण्यासाठी इतर स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्यांना मदतीचे आश्वासन पालिका व सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. मात्र त्याची कार्यवाही तितक्याच जलदगतीने व्हावी, अशी मागणी पीडितांनी केली आहे. अनेकदा शासन मदत जाहीर करते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती मदत लांंबल्याने पदरी निराशा येते. असा अनुभव काही पीडितांनी व्यक्त केला. रविवारी दुपारी सूर्योदय कपडा बँकेच्यावतीने कपड्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच लायन्स क्लब गांधी जयंतीच्यानिमित्ताने या भागात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करणार आहे. सगळा संसार त्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे दोनवेळचे अन्न शिजवण्यासाठी भांडीदेखील नाहीत. याकरिता सेव्ह द एनव्हायर्न्मेंट ग्रुपच्यावतीने गरजू पीडितांना भांडी देण्यात येणार आहेत. यात गॅस, स्टोव्हपासून इतर गरजू वस्तू असल्याचे हेमंत धामनुसे यांनी सांगितले. पालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दिले जाणार असून इतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे काय हा प्रश्न यावेळी पीडितांनी उपस्थित केला. याविषयी मुनी शेख यांनी सांगितले, माझी मुलगी गरवारे महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्गाला शिकते. दोन दिवसांपूर्वी तिचा पेपर होता. मात्र या घटनेनंतर सगळे चित्र बदलले.
घरात जेवढं काही होतं तेवढं सगळं वाहून गेल्याने तिला पेपर देता आले नाहीत. छोटी मुलगी एसएनडीटी महाविद्यालयात ११ वीच्या वर्गातआहे. मुलींच्या शिक्षणाविषयी पुढील काही दिवस त्रासदायक ठरणार असून त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. लवकरात लवकर परिस्थिती सुधारल्यास त्यांना नियमितपणे महाविद्यालयात जाता येईल. माझ्या दोन्ही मुली गेल्या चार दिवसांपासून शाळेत गेलेल्या नाहीत. त्यांना शाळेत पाठवायचे तर शाळेचे कपडे नाहीत, पाटी, पुस्तक, दप्तरे या सर्व वस्तू पाहिजेत. हे सगळंच वाहून गेल्याने काय करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर असल्याची भावना पीडित पूजा खंडागळे यांनी दिली.इथं कसं थांबायचं, कसं राहायचं सगळीकडे नुसता वास सुटलाय...४चार दिवस लोटल्यानंतरदेखील अद्याप दांडेकर पुलाजवळील वसाहतीत कालव्याच्या पाण्याचा, त्याबरोबर वाहून आलेल्या घाणीचा, त्यामुळे परिसरात तयार झालेल्या कचºयाची दुर्गंधी पसरली आहे. त्या सर्व भागातील घरांना ओलसरपणा आला असून त्याच्या वासाने तेथील नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे तातडीने परिसराची स्वच्छता करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून अनेकांनी‘‘इथं कसं थांबायचं, कसं राहायचं, सगळीकडे नुसता वास सुटलाय’’ या शब्दांत आपली व्यथा मांडली.