सांगवी : देशभरासोबतच पिंपरी-चिंचवडमधील दुकाने गुरुवारऐवजी बुधवारीच उघडण्याचा निर्णय सर्व सराफ संघटनांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उत्पादन शुल्काबाबत संघटनेचे निवेदन केंद्र सरकारकडे देण्यात येणार आहे. यावर सरकार कसा प्रतिसाद देते, त्यावर पुन्हा संप पुकारायचा की नाही, हे ठरविले जाणार आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये सराफांची सुमारे ४०० दुकाने आहेत. एक मार्चपासून अबकारी शुल्कवाढी विरोधात सराफांनी देशव्यापी बंद पुकारला होता. ४२ दिवसांपासून सराफांची दुकाने बंद होती. पाडव्यालासुद्धा सराफ दुकाने बंद असल्याने मोठे नुकसान सोसावे लागले होते. नागरिकांचीही गैरसोय निर्माण झाली होती. काहींनी लग्न, समारंभासाठी दागिन्यांची आगाऊ बुकिंग करून ठेवले होते. संप मागे घेतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी गुरूपुष्यामृतापासून दुकाने उघडण्याचा निर्णय झाला होता. मात्र, दिल्लीतील बैठकीत निर्णय झाल्याचे कळताच शहरातील सराफ व्यावसायिकांनी बुधवारीच दुकाने उघडली. सराफ संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सर्व प्रमुख सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी दिल्लीत झाली. येत्या २५ एप्रिलपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. तत्पूर्वी सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २५पासून पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात येईल, असे रांका यांनी सांगितले.व्यापाऱ्यांना विविध रजिस्टर सांभाळावी लागू नये, झडती व छाप्याची तरतूद काढून टाकावी, जुन्या दागिन्यांवर उत्पादन शुल्क आकारू नये, अशा मागण्या केल्या आहेत. या मागण्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मान्य न झाल्यास पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)सराफ व्यावसायिकांचा उत्पादन शुल्काला विरोध नाही. परंतु, तो घेण्याची पद्धत सरळ असावी. २५ एप्रिलपूर्वी सराकारने सराफांच्या मागण्या मान्य करून त्यांच्या बाजूने निर्णय घेणे अपेक्षित आहे.- दिलीप सोनिगरा अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशन
सराफांचा संप मागे, सर्व दुकाने उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 2:11 AM