बिबवेवाडी : महर्षीनगर येथील राजू हनुमंत अष्टगे (वय ३०) याचा आजारपणामुळे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला. परंतु त्याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल रुग्णालयाकडून कोणतेच स्पष्टीकरण दिले जात नसल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजू अष्टगे हे गेली दोन दिवस उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होते.
परंतु सोमवारी दुपारी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी महर्षीनगर परिसरात कळल्यामुळे सर्व परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या नातेवाइकांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती व त्याच्या मृत्यूचे कारण न समजल्यामुळे परिसरातील नागरिक व नातेवाइकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यादरम्यान हॉस्पिटल परिसरामध्ये दगडफेकीचा प्रकार घडून हॉस्पिटलच्या लॅबच्या खिडकीची काच फुटली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अष्टगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.मदत करणारा युवकराजू अष्टगे महर्षीनगर परिसरात संत नामदेव प्रशालेत अभ्यासिका चालवत असत. तळागाळातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मदत करत असल्यामुळे त्यांची परिसरामध्ये लोकप्रियता होती त्यामुळे त्यांच्या अचानक मृत्यूच्या बातमीमुळे परिसरावर शोककळा पसरली.