शिरूर (जि. पुणे) : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या संमेलनात सहभागी झालेले दहा जण क्वारंटाइनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार शिरूरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरूर येथील संबंधित केंद्राच्या प्रमुखासह ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील भाजीबाजार येथे तबलिगी जमातीचे प्रचारासाठी केंद्र आहे. लॉकडाऊन दरम्यान नगरपरिषदेच्या वतीने सर्वेक्षण चालू असताना या शिक्षण केंद्रात दिल्लीतून आलेले १० जण असल्याचे आढळले होते. १ एप्रिलला त्यांना होम क्वारंटाइन केले होते. संस्थेच्या दरवाजावर या संदर्भातील स्टिकर व संबधितांच्या हातावर शिक्के मारण्यात आले होते. शुक्रवारी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व नगरपालिका कर्मचारी तपासणीसाठी आले असता ते गायब झाल्याचे आढळून आले.