पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काही दिवसांपूर्वी पुण्यात दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु त्यांना मानवंदना देण्याच्या फाईलवर पाच तास सहीच होत नव्हती, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या दोन वर्षाच्या कालावधीतील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामावर परत कधी येतील याची गॅरंटी नाही. आणि महाराष्ट्राला पर्यायी मुख्यमंत्री देखील नाही. अशा प्रकारे राज्य चालत नाही. राज्य चालवण्याचेही काही नियम आहेत. तुम्ही दहा महिने विधानसभेचे अध्यक्ष निवडणार नाही, एकोणीस दिवसांपासून मुख्यमंत्री कामावर नाही, मग सह्या कोणी करायच्या? बाबासाहेब पुरंदरे यांच्या मृत्युनंतर त्यांना मानवंदना देण्याच्या फाइलवर पाच तास सहीच होत नव्हती, कारण महाराष्ट्राला पर्यायी मुख्यमंत्री नाही.
''उद्धव ठाकरे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. विद्यार्थीदशेपासून आम्ही मित्र आहोत. आजारी माणसाला लवकरात लवकर आराम पडावा अशी प्रार्थना करण्याची भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे मी अंबाबाईला आणि कसब्याच्या गणपतीला त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करतो. पण तोपर्यंत काय? सरकार असं चालतं का? व्हर्चुअल बैठकीला देखील मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ बंद असतो का? अधिवेशन नागपूरला नाही तर मुंबईला का? पाच दिवसांच अधिवेशन का? दोन दिवसांपासून अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांवर नाही, आमदारांनी काय चपात्या लाटायच्या का? असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.''