पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यात थंडीची चाहूल लागली नाही, दिवाळीमध्ये थंडी सुरू होईल, असाही अंदाज होता. पण दिवाळीनंतर थंडीने आता कुठे चाहुल द्यायला सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील तापमान २ अंशाने घसरले आहे. त्यामुळे शहरात सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत आहे. गुरूवारी सकाळी पुण्यात १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. सांगलीत सर्वाधिक गारठा जाणवत असून, गुरूवारी तिथे १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील तापमानामध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी राज्यात थंडी पडली नाही, पण पावसाचे वातावरण होते. दिवाळी संपली आणि पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये नीचांकी १४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यामध्ये कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पूर्व राजस्थान भागात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट झाली आहे. तर जम्मू, काश्मीर, लडाख, बाल्टीस्तान, मुजफ्फराबादम राजस्थान आणि गुजरातमध्ये कमाल तापमान जैसे थे पहायला मिळाले.
शहरात १३ अंशावर किमान तापमान
पुण्यामध्ये गुरूवारी (दि.७) शिवाजीनगरला १५.२ अंश सेल्सिअस तर हवेली १३.४, एनडीए १३.७, माळीण १४.७ किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक किमान तापमान वडगावशेरीत २१.८, मगरपट्टा २०.३ आणि कोरेगाव पार्कमध्ये १९.३ नोंदवले गेले. यंदा उन्हाळ्यात कमाल तापमान देखील वडगावशेरी, मगरपट्टा आणि कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक होते.
राज्यातील किमान तापमान
सांगली : १४.४अहिल्यानगर : १४.७
पुणे : १५.२जळगाव : १५.८
महाबळेश्वर : १५.६मालेगाव : १७.८
सातारा : १६.६परभणी : १८.३
नागपूर : १८.६