पुणे - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या लोकसभेच्या राजकीय लढतीमुळे चर्चेत आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना यंदा घरातूनच आव्हान देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार अशा राजकीय सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, दोन्ही पवार सध्या बारामतीमध्ये अधिक सक्रीय झाले आहेत. त्यातच, सुप्रिया सुळे सोशल मीडियातूनही अधिक सक्रीय असतात. अनेकदा सोशल मीडियातून त्या विविध प्रश्नांना धरुन सरकारला, संबंधित विभागाला प्रश्नही विचारतात. आता, बारामती मतदारसंघातील नागरिक प्रवाशांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होत रुळ ओलांडून फलाटावर यावे लागले. हा प्रसंग रात्री घडला, त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुले मालगाडीला वळसा घालून येईपर्यंत मेटाकुटीला आली होती. या घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे. त्यामध्ये, प्रवाशी खोळंबलेले दिसून येतात, तर फलाटावर जाण्यासाठी त्यांची होत असलेली कसरतही दिसून येते.
संबंधित घटनेनंसदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता, रेल्वे ड्राईव्हरची ड्युटी संपली म्हणून तो फलाटावरच गाडी लावून गेला असे बेजबाबदार उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु तरीही अशा पद्धतीच्या घटना घडणे हे चुकीचे आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना विनंती आहे की, या प्रकरणाची चौकशी करुन अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याबाबतच्या सुचना संबंधितांना द्याव्या, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रवाशात प्रवाशांना अनेकदा लहानमोठ्या अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो. कधी कधी ट्रेल वेळेपेक्षा अधिक लेट झाल्याने, तर कधी रेल्वेच्या कँटीनमधून आलेल्या जेवणाचा दर्जा घसरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.