समुपदेशनानंतर नांदण्यास गेलेल्या जोडप्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे, त्यांच्यातील वाद कायम मिटावे यासाठी कौटुंबिक न्यायालयात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने कौटुंबिक न्यायालयात ‘जोडी तुझी माझी’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी संबंधित जोडप्याने आपली कहाणी सर्वांना सांगितली. या वेळी कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. आर. काफरे, न्यायाधीश एच. के. गणात्रा, न्यायाधीश भालचंद्र नाईकवडे, आराध्ये, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे, रोटरीचे स्नेहा सुभेदार उपस्थित होत्या.
या वेळी वाद मिटवून एकत्र आलेल्या २० जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यातील नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी विविध खेळ, रोल प्लेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ विवाह समुपदेशक स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. तर, विवाह समुपदेशक संगीता पांडे, राणी दाते, नूतन अभंग, सुवर्णा पाटील, मृदुल पात्रीकर यांनी रोल प्ले सादर केला.
कौटुंबिक न्यायालयाची कार्यपद्धती इतर न्यायालयापेक्षा वेगळी आहे. कौटुंबिक दाव्यांमध्ये कुटुंब टिकावे आणि त्यांच्यात समेट घडवून यावा यासाठी समुपदेशनाद्वारे प्रयत्न केले जातात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून मोठे वाद वाढतात. त्यामुळे वाद वेळीच सामंजस्याने मिटायला हवे. मुलांच्या भविष्यासाठी अहंकार बाजूला ठेऊन नात्याचा विचार केला जावा, असे मत प्रमुख न्यायाधीश एस. आर काफरे यांनी व्यक्त केले.
जोडप्यांनी एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार करून नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे मत अॅड. वैशाली चांदणे यांनी व्यक्त केले.