-राजू इनामदार
पुणे : पुरंदर तालुक्यातील शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यानंतर आता पुणे महापालिकेतील काही माजी नगरसेवकही शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या स्थितीत आहेत. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. उपनगरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या माजी नगरसेवकाच्या प्रभागात खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या विरोधातील शिवसैनिकाला ताकद दिल्याने ही नाराजी असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली, त्यावेळी त्यांना जिल्ह्यातून शून्य प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांपैकी एकाही जागेवर शिवसेनेचा उमेदवार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कोणाही शिलेदाराचे कट्टर समर्थक जिल्ह्यात किंवा शहरात नाहीत. आता शिंदे यांच्या बाजूला जाणाऱ्या शिवसैनिकांची संख्या वाढत आहे. पुरंदरचे शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याची सुरुवात केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुकलेच असे जाहीरपणे म्हणत शिवतारे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीला उघडपणे उपस्थित राहिले. त्याशिवाय त्यांनी शिंदे यांचे अभिनंदन करणाऱ्या जाहिरातीही दिल्या. आता पुण्यातील माजी नगरसेवकानेही तशी तयारी दाखवल्याची माहिती मिळाली. संघटनेतील काही पदाधिकारीही शिंदे यांच्याबरोबर जवळीक कशी साधता येईल याच्या प्रयत्नामध्ये असल्याचे दिसते आहे. उपनगरातील या माजी नगरसेवकांचा प्रामुख्याने यात समावेश आहे.
हे पदाधिकारी म्हणतात...
- प्रभागातील विरोधकांना ताकद देणे, उमेदवारीचा शब्द देणे असा प्रकार शिवसेनेतीलच वरिष्ठांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटात जायचे आहे. अन्य काही माजी नगरसेवकांनाही बरोबर घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
- बंडखोर गटाला शिवसेना म्हणूनच मान्यता मिळणार असेल, तर तिथे त्यांच्याबरोबर जाण्यात गैर काय असा युक्तीवाद त्यांनी उपनगरांतील अन्य काही माजी नगरसेवक तसेच प्रमुख नेत्यांकडे केल्याचे समजते.
- अधिक वेळ लावला तर फायद्यासाठी म्हणून नंतर आमच्यात आले अशी टीका होईल, त्याऐवजी लगेच गेलो तर फायदा होईल असे त्यांना पटवून सांगण्यात येत आहे.
...तर का थांबायचे?
दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर बंडखोर गटाचे जाहीरपणे अभिनंदन केले म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली व नंतर ती मागे घेण्यात आली; मात्र त्यामुळे बंडखोर गटात जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांना बळ मिळाले आहे. मंत्र्यांसह ४० आमदारांना फोडणाऱ्या शिंदे यांना कमी का लेखायचे, असा प्रश्न ते करताना दिसतात. आपापल्या भागात ताकदीने उभे राहायचे असेल तर सत्तेची साथ हवीच, शिंदे यांच्यामुळे ती मिळत असेल तर का थांबायचे असे त्यांचे मत आहे.