पुणे आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली असून भाजप व काँग्रेसने उमेदवारही जाहीर केले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक दिनांक 26 फेब्रुवारीला होत असून भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आमदार बंधू शंकर जगताप की पत्नी अश्विनी जगताप? या चर्चेवर पडदा पडला आहे. तिकीट जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप यांना कुटुंबातील वादासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही, त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, तसंच घरात कुठलाही वाद नसल्याचे स्पष्ट केले.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघासाठीही भाजपचा उममेदवार जाहीर करण्यात आला आहे. येथून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. या जागेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. दिनाक 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप तसेच आमदार पत्नी अश्विनी जगताप या दोघांनीही अर्ज नेले होते. त्यामुळे दोघांपैकी नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत उत्सुकता होती. तर, कुटुंबातच वाद असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, या विरोधकांनी उठवलेल्या वावटळी असल्याच अश्विनी जगताप यांनी म्हटलं.
आमच्या कुटुंबात वाद असल्याचं केवळ वावटळ उठवलं होतं. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही. शंकरशेठ मला मुलासारखे आहेत, ३० वर्षांपासून आमचं कुटुंब एकत्र राहतं. आमच्या घरात ६ मुलं आहेत, मला एक मुलगी आहे, असं आम्ही कधीही म्हटलो नाही. मी आणि साहेब नेहमीच म्हणायचो की आम्हाला ६ मुलं आहेत, असे म्हणत घरात कुठलाही वाद नसल्याचं अश्विनी जगताप यांनी स्पष्ट केलं. तसेच, विरोधकांना हात जोडून विनंती आहे की, अशा वावटळी कुणीही उठवू नयेत. आमचं कुटुंब एक आहे, ते कायम एकच राहणार, असेही अश्विनी यांनी म्हटले.
मेट्रो सिटी करण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय
साहेबांचे जे स्वप्न अपूर्ण राहिले आहेत, ते पुढे नेण्याचा प्रयत्न मी करेन. लक्ष्मण जगताप यांचा वारसा मला पुढे न्यायचा आहे, मेट्रो सिटी करण्याची त्यांची जी महत्त्वाकांक्षा होती, ती पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करेन. पक्षाचा जो अजेंडा आहे, तो पुढे नेण्याचा प्रयत्न करीन, पक्षाचे सर्वच निर्णय मला मान्य आहेत, असेही अश्विनी जगताप यांनी म्हटलं.
भाजपचेही दोन्ही उमेदवार जाहीर
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी दुपारी उमेदवारी जाहीर करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चिंचवड मधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केली आहे. त्यामुळे, येथील जागेवर भाजपचा उमेदवार कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.